सोमेश्वरनगर | प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व २१ जागांवर विजय मिळवल्यानंतर आता कारखान्याच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे. निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चांना वेग आला असून, राजवर्धन शिंदे आणि प्रमोद काकडे या दोन नावांची प्रामुख्याने चर्चा सुरू आहे. दोघांनाही सहकार क्षेत्राचा अनुभव असल्याने अध्यक्षपदाची जबाबदारी नेमकी कोणाकडे सोपवली जाणार, याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजवर्धन शिंदे यांनी यापूर्वी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे कारखान्याच्या कामकाजाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे. याशिवाय, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. राजकीय संघटनात्मक कामाचा अनुभव आणि सहकार क्षेत्रातील वाटचाल या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जात आहेत. त्यामुळे शिंदे यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, प्रमोद काकडे यांचे नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. काकडे यांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती म्हणून काम पाहिले असून, त्यांचेही सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आणि सहकार क्षेत्रातील त्यांची वाटचाल यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजवर्धन शिंदे आणि प्रमोद काकडे या दोघांपैकी कोणाला अध्यक्षपदाची संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळासह कारखान्याच्या सभासदांमध्ये उत्सुकता आहे.
दोन्ही नेत्यांना सहकार क्षेत्राचा अनुभव असल्याने अनुभवी नेतृत्वाला पुन्हा संधी दिली जाणार की वेगळ्या चेहऱ्याला जबाबदारी सोपवली जाणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अध्यक्षपदासाठी एखाद्या अनपेक्षित चेहऱ्याला संधी देऊन सरप्राईज देणार का, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया येत्या पंधरवड्यात पूर्ण होणे अपेक्षित असल्याने आगामी काळात या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. याशिवाय, कारखान्याच्या परंपरेनुसार पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच गटांतील संचालकांना उपाध्यक्षपदाची संधी दिली जाते. ही परंपरा कायम राहणार का, याकडेही सभासदांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, कारखान्यातील दोन स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीत संधी न मिळालेल्या; मात्र पॅनेलच्या विजयासाठी योगदान दिलेल्या सभासदांना या जागांवर संधी मिळणार का, याबाबतही चर्चा सुरू आहे.
एकूणच, सोमेश्वर कारखान्यात सर्व २१ जागांवर विजय मिळवल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. सहकार क्षेत्राचा अनुभव असलेले राजवर्धन शिंदे आणि प्रमोद काकडे या दोघांच्या नावांची चर्चा सुरू असताना, सुनेत्रा पवार कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आणि अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


0 Comments